Monday, August 16, 2010

Freedom of a different kind...

There is something about flowing water.. It gives you eneregy. And now I feel full of it..
पावसाळा आणि रविवार म्हणजे कर्जतला जाणाऱ्या सगळ्या गाड्या फुल. मुंबईकर या परिसरात धाव घेतात. भिवपुरी रोडचा- आषाण्याचा धबधबा गर्दीनं फुलून जातो. वदपचा मात्र त्याला अपवाद आहे. वदपला आषाण्यासारखी हॉटेल्स, इतर सोयी नाहीत म्हणून असेल कदाचित पण इथला निसर्ग अजूनही जवळपास untouched आहे.

कर्जतकरांसाठी आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्या भटक्यांसाठी वदप नवं नाही. ट्रेकर्सचं नंदनवन असलेल्या या परिसरातला एक कठीण ट्रेक आहे ढाक-भीमाशंकर. मिनी माथेरान अशी ओळख याच ढाकच्या पायथ्याशी आहे वदप गाव. ज्या डोंगरात ढाकचं पठार आहे, त्याच डोंगरात वदपच्या बाजूला एक पावसाळी धबधबा आहे.

एकाबाजूला भीमगडची टेकडी आणि दुसरीकडे ढाकला जाणारा रस्ता यांचा पाहरेकरीच आहे सुभेदार धबधबा. मी स्वतः याआधी एकदाच कधीतरी लहानपणी इथं गेले होते.

वदपला कर्जत-जांभिवली रस्त्यावरून एक पायवाट या धबधब्याकडे जाते. पायवाट असली तरी वर ढाकला राहणाऱ्या लोकांसाठी ती वाटच राजमार्ग आहे. त्याच वाटेवरून चालत आम्ही निघालो. आम्ही म्हणजे आम्ही तिघीच- मी, प्रणाली आणि पद्मा. पायवाटेला लागल्यावर आम्ही चपलांनाही सुटी दिली. आणि ओलसर मातीतून चालू लागलो. एरवी धुक्यात, ढगाआड असणारा डोंगर आज सूर्यप्रकाशात चमकत होता मधूनच. पण त्यामुळं सुभेदार आणखीनच सुंदर दिसतात.

पायवाटेवरून चालताना सतत पाण्याची गाज साथ देत राहते. दुरून जवळ वाटणारा डोंगर पण वळणावळणाच्या रस्तामुळं किमान अर्धा किलोमीटर चालावं लागतं आणि मग पाण्याचं पहिलं दर्शन होतं. वदपचा धबधबा अनेक स्टेप्समध्ये आहे. किमान चार ठिकाणी पाणी थेट खाली झेप घेतं. आम्ही वरून दुसऱ्या स्टेपपर्यंत गेलो. अर्थात वाटेत पाण्यात डुबकी मारण्यासाठी थांबत थांबतच.

धबधब्यापर्यंत पोहोचणं तर सोपं आहे, पण वर चढ मात्र बराच आहे. पायवाटासुद्धा भरपूर पाऊस पडला तर पाण्यानं भरून वाहणाऱ्या.. कधी धबधब्यातून तर कधी निसरड्या, जंगलात हरवणाऱ्या पायवाटांवरून आम्ही चढत गेलो. वर जाऊ तसा चढ आणखी खडा होतो. दाट झाड़ीतून रस्ता शोधत, पाण्याच्या आवाजाच्या आधारानं आम्ही वर चढलो. आणि अर्थाच सगळा थकवा विसरून गेलो. पाणी तर फ्रीजरमधून काढल्यासारखं गारेगार. वर डोंगरावर ढगांची मीटिंग चाललीय. समोर दरीत भातशेती वाऱ्यावर डोलतेय.. मधूनच सूर्याजीराव डोकावून जातायत... उजवीकडच्या भीमगडावर बकऱ्या चरायला जातायत.. डावीकडे ढाकवाले सराईतपणे गावाच्या रस्त्यानं चढतायत..

आमच्यासाठी तो स्वर्गच होता. पण वर राहणाऱ्यांसाठी जगणं किती कठीण आहे याचीही ती झलक होती. पुढचा ट्रेक ढाकपर्यंत, असं ठरवूनही टाकलंय. पाहुयात, कधी जमतोय बेत..
स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्ही तिथं गेलो होतो आणि म्हणूनच तो अनुभव वेगळा ठरला. वास्तवाची जाणीव करून देणारा. या परिसरावर निसर्गानं आपला जीव ओवाळून टाकलाय अगदी. पण जगणं अगदी खडतर आहे इथं. डोंगरमाथ्यावर ढाकमध्ये तर आता आतापर्यंत वीज नव्हती. सोलर पॅनल्सनी तो प्रश्न सोडवलाय. एरवी माणसांची जा-ये फारशी नसायचीच. आता इथंही वावर वाढलाय आणि प्लॅस्टिक बॅग्ज दिसू लागल्यायत. पण परिस्थिती अगदीच हाताबाहेर जाणार नाही याचीही वेळीच काळजी घ्यायला हवी.

No comments:

Post a Comment