Sunday, October 17, 2010

जयदेव.. जयदेव...

काल ब-याच दिवसांनी देवळात आरती करायला गेले होते. बऱ्याच वर्षांनी म्हणायला हवं. माझ्या घरी नवरात्र नाही, फारसं देवा धर्माचंही काही बंधन नाही. म्हणजे सक्ती नाही. पण नवरात्रातल्या आरतीची एक परंपरा बनली आहे. शेजारीच कपालेश्वराचं मंदीर आहे आणि गेल्या तीन पिढ्या तरी घट बसल्यापासून तिथल्या आरतीला आमच्या घरचा पुढाकार असायचा. माझ्या बाबा आणि काकांनी आरती संग्रह देखील प्रकाशित केला होता.

एरवी मी देवळात सहसा जात नाही, आणि कधी गेलेच तर देवळात आहे म्हणून लगेच कुणाहीपुढे हात जोडत नाही. पण आरती करायला आवडायचं. तो झांजा-टाळ-घंटांचा नाद.. सगळ्या लोकांचं एका स्वरात गाणं.. आणि नंतर मंत्रपुष्प म्हणताना धीरगंभीर वातावरण.. भारावून जायला व्हायचं. त्यातही कुणाला कीती आरत्या येतात, कोणाचा आवाज मोठ्ठाय आणि कोणाचे उच्चार अगदी स्पष्टयत, अशी काहीशी चढाओढ लागायची. 'अश्विन शुद्ध पक्षी' सुरू झाल्यावर तर विचारायलाच नको. दोन ग्रुप पडायचे चक्क. कोण कुठल्या आरतीला कसा पॉझ घेणार, कोण कुठले देवे म्हणणार, कोण कुठं उभं राहणार हेही ठरून गेलं होतं.

खूप आरत्या पाठ होत्या तेव्हा. त्या कुठून आल्या, कशा रुजल्या याचीही माहिती जमा केली होती. आणि नवरात्रात रोज रात्री साडे नऊ वाजता देवळात हजर व्हायचो सगळा अभ्यास वगैरे आटोपून. कधीच खंड पडला नाही.

देवळात आरती सुरू असताना बाहेर चौकात गुजराथी समाजाचा गरबा सुरू व्हायचा. आणि त्या लाऊडस्पीकरच्या आवाजातही आरतीचा एकजीव सूरच ऐकू यायचा. मला तेव्हा प्रश्न पडायचा- आजही पडतो. एकाच देवीची पुजा करणारे लोक, एकाच आईची लेकरं अशी वेगवेगळी चूल का मांडतात?

नवरात्राचं खरं रूप कोणतंय? देवळातली पूजा-आरती, घरोघरची घटस्थापना,भोंडला, गरबा, रावणवध, शाळेतला शारदोत्सव सोने खरेदी की शेतावरची कापणी? की हे सगळं आणि आणखी बरंच काही?

प्रश्न पडत राहिले.. भाबडी श्रद्धा कमी होत गेली तशी मी मंदिरापासून दूर गेले. आरती करायला मात्र नेमानं जायचे. नंतर 'बिझी शेड्युल'मध्ये तेही सुटलं. काळ पुढे सरकत गेला, तशी आरतीची एक एक मंडळी कमी होत गेली. आरत्यांची संख्याही कमी झाली. काही मंडळी मात्र टिकून राहिली आहेत. मी तीन वर्षांनी आरतीसाठी गेले तेव्हा खूप नॉस्टॅल्जिक झाले. एक वेगळीच हुरहूर वाटली आणि समाधानही. आरत्या सगळ्याच विसरून गेलेले नाहीए.. त्यावेळचा आनंदही तसाच आहे. कदाचित देवळात कोणतही मागणं घेऊन गेले नव्हते म्हणून असेल, पण खूप शांत वाटलं बऱ्याच दिवसांनी.